Header Ads

Ahmednagar Congress: प्रदेशाध्यक्ष आ.पटोले आणि आ.थोरात यांनी घेतला जिल्हा काँग्रेसचा आढावा

 Ahmednagar Congress: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज राहण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना 

Ahmednagar Congress: प्रदेशाध्यक्ष आ.पटोले आणि आ.थोरात यांनी घेतला जिल्हा काँग्रेसचा आढावा


Ahmednagar Congress: 
अहमदनगर (प्रतिनिधी): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून राज्यभरामध्ये विभागीय बैठकांचा धडाका सुरू आहे. अहमदनगरसह उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक नाशिक येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकतीच पार पडली. यावेळी त्यांनी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी शहरातील कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना यावेळी काँग्रेस नेत्यांनी केल्या. 

नाशिक येथे पार पडलेल्या बैठकीला उत्तर महाराष्ट्र विभागाच्या प्रभारी तथा प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी तथा प्रदेश सचिव अनिल पाटील, राज्याचे प्रवक्ते राजेंद्र वाघमारे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, महिला आयोगाच्या सदस्या तथा प्रदेश सचिव उत्कर्ष रूपवते आदींसह राज्यातील प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. 


शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे हे वडिलांचे निधन झाल्यामुळे या बैठकीत सहभागी होऊ शकले नाही. मात्र शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी यावेळी शहराचा संघटनात्मक आढावा श्रेष्ठींसमोर मांडला. यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, काँग्रेसच्या व्यापार व उद्योग आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष मनसुखशेठ संचेती, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरिवाला यांच्यासह शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते या बैठकीत सहभागी झाले होते. 


मनोज गुंदेचा यांनी यावेळी आढावा सादर करताना सांगितले की, नगर शहरामध्ये काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढली आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक ही स्वबळावर लढण्याची तयारी शहरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आ. बाळासाहेब थोरात, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली केली आहे. 


आ.थोरात, आ.रवींद्र धंगेकर यांच्या उपस्थितीत किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मागील महिन्यात झालेल्या शहरातील जनसंवाद यात्रा व जनसंवाद सभेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. शहर विधानसभेची जागा महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस लढण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. काळे यांच्या रूपाने पक्षाकडे निवडून येणारा सक्षम उमेदवार आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेस निश्चित जिंकेल असा विश्वास यावेळी गंदेचा यांनी श्रेष्ठींसमोर व्यक्त केला. 


आ. पटोले, आ. थोरातंकडून काळेंचे कौतुक : 

आ.थोरात म्हणाले, नगर शहरांमध्ये संघटना उभी करणे हे सोपे नव्हते. मात्र किरण काळे यांनी विकासाचे व्हिजन ठेवत निर्भीडपणाने दहशतीला न जुमानता कष्टकरी, गोरगरीब, युवक, महिला, व्यापारी, उद्योजक, नोकरदार अशा सर्वच घटकांना बरोबर घेत तळागाळात काँग्रेस पोहोचण्याचे काम केले. हे कौतुकास्पद आहे. त्याचा धागा पकडत आ.पटोले म्हणाले, किरणचे काम निश्चितच चांगले आहे. आम्हाला शहरांमध्ये काँग्रेस अधिक मजबूत करायची आहे. कार्यकर्त्यांना पक्ष संघटना बांधणीसाठी आणि आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सर्व ताकद देण्याचे काम प्रदेश काँग्रेस कडून केले जाईल. शहर विधानसभा क्षेत्रातील सर्व बूथ कमिट्यांवर प्रतिनिधी नेमण्याची सूचना पटोलेंनी यावेळी केली. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.