Header Ads

Ahmednagar Congress: परवाना शुल्क वसुलीला काँग्रेसच्या विरोधानंतर व्यापारी संघटना देखील आक्रमक

  


Ahmednagar Congress: किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची व्यापारी, दुकानदारांशी संवाद मोहीम

Ahmednagar Congress: किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची व्यापारी, दुकानदारांशी संवाद मोहीम

Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी)  : मनपा हद्दीतील सुमारे ३५५ प्रकारच्या विविध दुकानदार, व्यापारी आस्थापनांकडून रुपये १५ हजारां पर्यंत व्यवसाय परवाना शुल्क आकारणीच्या निर्णयाला महासभेच्या मंजुरीनंतर प्रशासनाने प्रत्यक्ष अंमलबजावणीची तयारी सुरू केली आहे. याला शहर काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. त्यानंतर आता विविध व्यापारी संघटना देखील या विरोधात आक्रमक झाल्या आहेत. 

शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली या बेबंदशाही विरोधात जनजागृतीसाठी व्यापारी, दुकानदारांच्या विविध संघटना, असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांच्या भेटीगाठींसह संवाद मोहीम उघडण्यात आली आहे. याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

Ahmednagar Congress: परवाना शुल्क वसुलीला काँग्रेसच्या विरोधानंतर व्यापारी संघटना देखील आक्रमक
मनपाला काँग्रेसने दिलेल्या निवेदनाचे पत्र व्यापारी संघटनांना दिले जात आहे. महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुभाष मुथा यांनी देखील संघटनेच्या वतीने तीव्र विरोध केला आहे. एमजी रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शामराव देडगावकर, सचिव किरण व्होरा, नंदलाल दोडेजा, सुशील येवलेकर, विशाख वैद्य, संजय भंडारी, आदित्य गांधी, नरेंद्र कटारिया, दीपक तलरेजा, 

घर संसारचे अशोकशेठ उपाध्ये आदींनी देखील असोसिएशनच्या वतीने सदर निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक संजय झिंजे, कामगार काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, उपाध्यक्ष अलतमश जरिवाला, क्रीडा व युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, आनंद जवंजाळ, अभिनय गायकवाड, विजयकुमार गायकवाड आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना एमजी रोड संघटनेचे सचिव किरण व्होरा म्हणाले की, सर्व आस्थापनांकडून परवाना शुल्क वसुली केली जाणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. काँग्रेसने याला विरोध केला आहे. सर्व व्यापारी संघटनांचाही याला विरोध आहे. आधीच आम्ही अनेक कर भरतो. प्रत्येक वस्तूवर जीएसटी आहे. 

साठ वर्षात यापूर्वी कधी खाण्या, पिण्याचे पदार्थ, कपडे, साडी, स्वेटर, चादर आदींवर कर नव्हता. मात्र आता आहे. मनपाकडून व्यापाऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र रस्त्यांची परिस्थिती पाहिली तर लाज वाटते. पाणी, लाईट, ड्रेनेजच्या पुरेशा सुविधा नाहीत. साध्या मुतारीची व्यवस्था नाही. आधीच व्यापारात ४० ते ५० टक्के हून अधिक घट झाली आहे. आम्हाला त्यामुळे अधिकचा कर भरणे परवडणारे नाही. आम्ही सर्व असोसिएशन एकत्र येऊन या विरोधात मोठा लढा देऊ. शासन, जिल्हाधिकारी, आयुक्तांना निवेदन देत कडाडून विरोध करु. सर्व असोसिएशनची एकत्रित बैठक घेऊन या वसुलीला कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कशा पद्धतीने पुढे जायचे याचा लवकरच निर्णय घेतला जाईल. 

काँग्रेसचे एकजुटीचे आवाहन : 

किरण काळे यांनी आवाहन केले आहे की, शहरात छोट्या-मोठ्या विविध व्यवसायांच्या मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरांमध्ये मिळून सुमारे ८० हून अधिक संघटना आहेत. सर्वांनी एकजूट दाखवावी. आपले दुकान, व्यवसाय जिथे आहे त्या प्रभागाच्या नगरसेवक, त्यांच्या राजकिय पक्षांनी महासभेत ठराव मंजूर केलाच कसा असा जाब प्रत्येकाला विचारावा. हा व्यावसायिकांच्या तिजोरीवर वाजत-गाजत दिवसा-ढवळ्या दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे. हे भूत कायमस्वरूपी मानगुटीवर बसण्यापूर्वीच लोकशाही मार्गाने हाणून पाडण्यासाठी व्यवसायिकांनी एकजूट दाखविण्याचे आवाहन काळे यांनी केले आहे. 

किरण काळे यांनी गंज बाजारातील व्यवसायिकांच्या देखिल भावना जाणून घेतल्या. यावेळी अरुण बोरा, इम्रान धावडे, अब्दुल हमीद, अब्दुल मजीद, हेमराज गांधी, अजित भेरी, प्रीतम शहा आदींसह दुकानदार मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान, काळेंच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस सर्व व्यावसायिक असोसिएशनच्या भेटीगाठीची मोहीम राबवत व्यवसायिकांमध्ये जनजगृती करणार असल्याची माहिती काँग्रेस व्यापार व उद्योग आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष मनसुख संचेती, मनोज गुंदेचा, सचिव रतिलाल भंडारी यांनी दिली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.