Header Ads

Ahmednagar Collector: डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना १५ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावेत

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत इच्छुक मदरशांनी १५ जानेवारीपर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सादर करावेत अहमदनगर दि. २ जानेवारी २०२४ :- सन 2023-24 या वर्षासाठी मदरशांना पायाभुत सुविधा व शिक्षकांचे मानधन देण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत इच्छुक मदरशांनी १५ जानेवारी, २०२४ पर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज जिल्हा नियोजन, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे सादर करण्याचे आवाहन दीपक दातीर, जिल्हा नियोजन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

  योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरसांना दिला जाईल. ज्या मदरशांना स्कीम फॉर प्रोव्हायडींग क्‍ वालिटी एज्युकेशन इन मदरसा या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळालेला आहे अशा मदरशांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही. मदरशांमध्ये विज्ञान, गणित, समाजशास्त्र,हिंदी, मराठी व इंग्रजी या विषयांचा अभ्यासक्रम राज्य शासनाच्या अन्य शाळांप्रमाणेच राहील. मदरशांमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रतिदिन पाच तासिकाप्रमाणे कामाचे तास निश्चित करण्यात येतील. या योजनेंतर्गत खालील पायाभूत सुविधांसाठी अनुदान देय आहे.
     मदरशाच्या इमारतींचे नुतनीकरण व डागडुजी, पेयजलाची व्यवस्था करणे, प्रसाधनगृह उभारणे, डागडुजी करणे, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक फर्निचर, मदरशांच्या निवासस्थानात इनव्हर्टरची सुविधा निर्माण करणे, मदरशांच्या निवासी इमारतीचे नुतणीकरण व डागडुजी, संगणक, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, प्रिंटर्स, प्रयोगशाळा साहित्य सायन्स किट मॅथेमॅटीक्स किट व इतर साहित्य.
  शासनाच्या ११ ऑक्टोबर, २०१३ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सादर करावेत. शासन निर्णय व अर्जाचा नमुना http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

(जि.मा.का.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.