Header Ads

Ahmednagar News: विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यासाठी शिक्षकांनी भावनिक बुद्धीमत्तेवर काम करावे - श्रीगोपाल जाखोटिया


विचार भारतीच्या शैक्षणीक कार्यशाळेस शिक्षकांचा प्रतिसाद


Ahmednagar News: विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यासाठी शिक्षकांनी भावनिक बुद्धीमत्तेवर काम करावे - श्रीगोपाल जाखोटिया     अहमदनगर (प्रतिनिधी) - शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानामुळे झपाट्याने अमुलाग्र बदल होत आहे. त्यामुळे शिक्षकांनी अपडेट राहणे आवश्यक आहे. विद्यार्थी बर्‍याचदा आई-वडिलांचे ऐकत नाहीत, पण शिक्षकांनी सांगितल्यावर ऐकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे चांगले मित्र बनून त्यांना चांगल्या गोष्टी शिकवा. जुन्या काळात मुलांना सहजासहजी काही मिळत नसे. संघर्ष केल्यावर हव्या असलेल्या वस्तू सुविधा मिळत असे. मात्र नव्या पिढीला पालक पाहिजे ते लगेच देत असल्याने त्यांच्यातील  संयम कमी झाला आहे. त्यामुळे विपरीत परीस्थितीला कसे तोंड द्यायचे हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांनी भावनिक बुद्धीमत्तेवर काम करणे आवश्यक आहे.


 याने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल व ते उद्याचे चांगले नागरिक घडतील. शहरातील शाळांचा शैक्षणीक स्तर उंचावण्यासाठी विचार भारतीचे सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनचे संचालक श्रीगोपाल जाखोटिया यांनी केले.


     नगर शहरात प्रबोधन, उद्बोधन व समुपदेशनातून समाज परिवर्तनासाठी काम करणार्‍या विचार भारती संस्थेच्या शैक्षणीक उपक्रमांतर्गत शहरातील विविध शाळांमधील शिक्षकांसाठी संवादाची प्रक्रिया व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रेणावीकर विद्यालयात झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन श्रीगोपाल जाखोटिया यांच्या हस्ते भारतमाता व सरस्वती देवीच्या पूजनाने झाले. 


यावेळी तज्ञ मार्गदर्शक वक्त्या माया कुलकर्णी व सुरेखा नंदे, रेणाविकर विद्यालयाचे मुख्याध्यापक (माध्य.) श्री.वसावे, मुख्याध्यापिका (प्राथ.) सौ.कारंडे,  माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, अशोकराव गायकवाड, प्रकल्प प्रमुख प्रशांत आढाव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. विचार भारतीचे मार्गदर्शक राजाभूऊ मुळे, सचिव सुधीर लांडगे, सदस्य अनंत देसाई, रवींद्र बारस्कर, अनिल मोहिते आदींसह शहरातील विविध शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्यने उपस्थित होते.


     या कार्यशाळेत वक्त्या माया कुलकर्णी यांनी विद्यार्थी शिक्षक संवाद यावर विचार मांडले,  सुरेखा नंदे यांनी माणूस घडवण्याचा अनुबंध यावर विचार व्यक्त केले. शिक्षण तज्ञ संजय पुरंदरे यांचे आर्य चाणक्य - प्राचीन शिक्षण पद्धती व मूल्ये यावरील व्याख्यानाने कार्यशाळेचा समारोप झाला.


     प्रास्ताविकात महेंद्र जाखोटे यांनी विचार भारतीच्या विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांची माहिती देवून नागरिकांनी विचार भारतीच्या समाज परिवर्तनाच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विशारद पेटकर यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.