Book Publication: दिलीप डेरेकर यांच्या ’ निर्भार क्षणांच्या जाणिवेत ’ या कविता संग्रहाच्या प्रकाशन
Book Publication: अहमदनगर (प्रतिनिधी) - माणसातील माणूसपण जपण्याच्या वृत्तीच्या मुळाशी कविता ही प्रेरणा असते. कोणत्याही क्षेत्रातील उत्तम कलावंतांच्या ठायी हीच वृत्ती असते. दिलीप डेरेकर यांचे अनुभव ऐकताना आणि त्यांच्या कविता वाचताना याचा प्रत्यय येतो. माणूसपण जागृत ठेवताना त्यांची समर्पणाची भावना देखील यातून प्रकर्षाने जाणवते, असे गौरवोद्गार महाराष्ट्रातील नामवंत कवी प्रा. शशिकांत शिंदे यांनी काढले.
दि इंडियन ह्यूम पाइप कं. लि. मधील निवृत्त शाखा व्यवस्थापक दिलीप डेरेकर यांच्या ’ निर्भार क्षणांच्या जाणिवेत ’ या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रा. शिंदे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे च्या सावेडी शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येलूलकर, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, लेखक नंदकिशोर आढाव, उमेश पागे, ‘अमृतकला’ चे संचालक मास्टर क्राफ्ट्समन जिनदास अन्नदाते तसेच काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ आणि आतील रेखाचित्रे रेखाटणार्या चित्रकार -लेखिका ज्योती डेरेकर पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
या संग्रहाच्या शीर्षकाचे अक्षर लेखन नामवंत ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी केले आहे. तर पुणे येथील व्यंकटेश कल्याणकर यांच्या वल्लरी प्रकाशनामार्फत तो प्रकाशित करण्यात आला आहे.पत्रकार सतीश डेरेकर यांनी स्वागत केले.
कवी दिलीप डेरेकर मनोगतात म्हणाले, बालपणापासून वाचनाच्या आवडीमुळे साहित्याची गोडी वाढत गेली आणि कविता सहज स्फुरत गेल्या. वेगवेगळ्या लेखकांच्या विविध प्रकारच्या साहित्याचे वाचन हीच माझ्या काव्यलेखना मागील प्रेरणा आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत पालवे म्हणाले, प्रपंचाच्या व्यस्ततेत संवेदनशील माणसाच्या मनाच्या तळाशी असलेली प्रतिभा बर्याचदा दबून राहते, तिचा आविष्कार जबाबदार्यातून निर्भार झाल्यावर होत असतो. डेरेकरांचा ’निर्भार क्षणांच्या जाणिवेत ’ हा काव्यसंग्रह याची साक्ष देतो.
जयंत येलूलकर यांनी कविता संग्रह प्रकाशनाचा हा छोटेखानी सोहळा मोठा प्रेरणादायी असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ. अर्चना सोनटक्के, श्री.आढाव, श्री. पागे, ज्योती डेरेकर यांनीही दिलीप डेरेकर यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
सौ. शालिनी डेरेकर तसेच विश्राम व प्रणाली, पराग व चेतना डेरेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. वृषाली व अनुराधा अन्नदाते यांनी सहकार्य केले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com