Header Ads

Sitaram Sarda School: वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न इतर शाळांना नक्कीच प्रेरणादायी- मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी

 जागतिक पुस्तक दिनानिमित्त शिक्षकांचा वाचनाचा आगळा वेगळा उपक्रम


Sitaram Sarda School: वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न इतर शाळांना नक्कीच प्रेरणादायी- मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी




     अहमदनगर (प्रतिनिधी) -  शिक्षक वाचत नाहीत, ही तक्रार अनेकदा केली जाते. पण याबाबत केवळ तक्रार न करता सीताराम सारडा विद्यालयाने वाचनाविषयी वेगळा उपक्रम राबवला. केवळ 10 महिन्यात शिक्षकांनी 20 ते 25 पुस्तके वाचली आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांनी पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तक भिशी हा अनोखा उपक्रम राबवला आहे. शिक्षकांची वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी केलेले हे प्रयत्न इतर शाळांना नक्कीच प्रेरणादायक व अनुकरणीय आहेत, असे प्रतिपादन मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांनी केले.


     हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात  जुलै महिन्यात मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांनी शिक्षणावर आधारित असलेली अनेक प्रेरणादायक पुस्तके शाळेसाठी खरेदी केली व ती पुस्तके शिक्षकांना देवून रोज किमान 20 पाने वाचावीत असे आवाहन केले. रोज शिक्षक हजेरी पत्रकावर सही करताना मुख्याध्यापकांनी काल किती पाने वाचली याचा आढावा घेवून त्याच्या नोंदी ठेवल्या. एक पुस्तक वाचल्यावर शिक्षकांनी एका स्वतंत्र वहीत प्रत्येक पुस्तकाचा परिचय लिहिला. आज सर्व शिक्षकांची 20 ते 25 पुस्तके वाचून झाली आहेत व त्याचे पुस्तक परिचय ही लिहून झाले आहेत.


     शिक्षकांनी वाचलेल्या पुस्तकात जास्तीत जास्त शैक्षणिक पुस्तके आहेत. तोत्तोचान, नीलची शाळा, माझी काटे मुंढरीची शाळा, दिवास्वप्न, प्रिय बाई, न पेटलेले दिवे, आमचा काय गुन्हा, विनोबा, लीलाताई पाटील यांची पुस्तके यांचा समावेश आहे.


     सुरुवातीला रोज वाचनाची सवय होईपर्यंत थोडा कंटाळा वाटला पण आता वाचन हा सवयीचा भाग आहे असे शिक्षक सांगतात. सुटीच्या दिवशी तर काही शिक्षकांनी 100 पाने ही वाचली आहेत. या वाचनाचा परिणाम शिक्षकांच्या दैनंदिन अध्यापनावर ही होतो आहे. खरे शिक्षण कशाला म्हणतात हे यानिमित्ताने समजले आहे.  या पुस्तकातून विविध उपक्रम करण्याची प्रेरणा मिळाली असेही शिक्षकांनी सांगितले.


     त्याचप्रमाणे शिक्षकांना पुस्तक खरेदीची सवय लावावी म्हणून शाळेत पुस्तक भिशी सुरू करण्यात आली आहे. दर महिन्याला शिक्षक पैसे काढतात आणि त्यातून तीन क्रमांक काढून त्या तिघांना प्रत्येकी 3500 रुपये दिले जातात. ते शिक्षक दुकानात जाऊन शिक्षण विषयक पुस्तके खरेदी करतात आणि सर्वांना आणून दाखवतात व वाचनप्रेमी पाहुणा निमंत्रित करून त्याच्या हस्ते ती पुस्तके दिली जातात. वाचन प्रेमी पाहुणा आवडत्या पुस्तकांविषयी बोलतात. संस्थेचे पदाधिकारी आवर्जून या पुस्तक भिशी उपक्रमाला उपस्थित राहतात. त्या सर्व पदाधिकार्‍यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.  नितीन केणे व शीतल शिंदे हे शिक्षक भिशिचे नियोजन करतात.


     अहमदनगर शहरातील पुस्तक दुकानदार व वाचनालयाचे पदाधिकारी यांचा शहरात वाचन संस्कृती रुजवत असल्यामुळे कृतज्ञता म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.